अकोला – विदर्भातील थंडी आणि प्रखर सूर्यकिरणांमुळे आता महाबळेश्वरपेक्षाही गोड स्ट्रॉबेरी उत्पादन घेता येत असल्याचे एका प्रयोगातून सिद्ध झाले आहे.या पार्श्वभूमीवर विदर्भातील वातावरणात उत्पादन घेता येणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या पाच जातींवर डॉ.पंजाबराव देशमुख विद्यापीठाने संशोधन हाती घेतले आहे.
अकोला जिल्ह्यातील पातूर, अकोट व तेल्हारा तालुक्यांतील वातावरण या पिकासाठी पोषक आहे. यामुळे या भागातही या पिकांचा प्रसार करण्याचा कृषी शास्त्रज्ञांचा मानस आहे.सध्या वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा कृषी विज्ञान केंद्रांतर्गत आठ शेतकऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून रोपे आणून १८ हेक्टरवर स्ट्रॉबेरी लागवड केली आहे.एका एकरात जवळपास या शेतकऱ्यांना चार ते पाच लाख रुपयांचे उत्पादन झाले आहे.दोन ते अडीच लाख लागवडीचा खर्च वजा केला तरी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न या शेतकऱ्यांना मिळणार आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पुढाकार घेत स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.