साखर आणि मीठही धोकादायक प्रत्येक नमुन्यात प्लास्टिकचे कण

मुंबई – समाजमाध्यमांवर प्लास्टिकच्या तांदळामुळे लोकांच्या मनात भीती असतानाच दैनंदिन वापरातील मीठ व साखरेच्या प्रत्येक नमुन्यात आता प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण आढळले आहेत. भारतीयांच्या आरोग्यासाठी हे अत्यंत धोकादायक आहे. टॉक्सिक्स लिंक या पर्यावरण संशोधक संस्थेने सर्व ब्रँड व सर्व प्रकारच्या खुल्या साखर व मिठावर संशोधन करून हा धक्कादायक अहवाल सादर केला आहे. त्यात आयोजाईज्ड मिठात सर्वाधिक प्लास्टिक आढळले.
देशात विकल्या जाणार्‍या सर्वच मोठ्या, छोट्या ब्रॅण्डच्या तसेच खुल्या स्वरुपात मिळणार्‍या मिठात व साखरेत प्लास्टिकचे सूक्ष्म तुकडे आढळले आहेत. टेबल सॉल्ट, रॉक सॉल्ट, समुद्री मीठ आणि स्थानिक कच्च्या मिठात तसेच खुल्या व पाकिटबंद साखरेतही हे मायक्रोप्लास्टिक्सचे तुकडे आढळले आहेत. ऑर्गेनिक रॉक मिठात प्लास्टिक कमी प्रमाणात आढळले तर आयोजाईज्ड मिठात सर्वात जास्त प्लास्टिक होते. टॉक्सिक्स लिंक या संस्थेने देशातील विविध स्वरुपातील मिठाच्या व साखरेच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर हे निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. मीठ व साखरेमध्ये वेगवेगळ्या आकारात प्लास्टिकचे तुकडे असून ते तंतू किंवा छोट्या गोळ्यांच्या स्वरुपात असतात. या मायक्रोप्लास्टिक्सच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहोचू शकते. मिठाच्या नमुन्यामध्ये प्रति किलोग्रॅम 6.5 ते 90 तुकडे आढळून आले. साखरेत 11.5 ते 70 पर्यंत मायक्रोप्लास्टिक्सचे तुकडे आढळून आले आहेत.
शरीराला हानीकारक असल्यामुळे मायक्रोप्लास्टिक्स हा जागतिक स्तरावरील चिंतेचा विषय आहे. मायक्रोप्लास्टिक्सचे संशोधन करणार्‍या टॉक्सिक्स लिंक संस्थेचे सह संचालक सतिश सिन्हा म्हणाले की, या संशोधनातून मायक्रोप्लास्टिक्सला प्रतिबंध करणारे जागतिक धोरण तयार करण्यात यावे, अशी आमची अपेक्षा आहे. त्याचा शरीरावर होणारा परिणाम कमी करणार्‍या घटकांचे संशोधन व्हावे. मीठ व साखरेत मायक्रोप्लास्टिक्सचे कण आढळणे हा चिंतेचा विषय आहे. त्याचे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. हे सूक्ष्म प्लास्टिकचे कण अन्न, पाणी आणि हवेतूनही मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. संशोधनामध्ये हे कण फुफ्फुसे, हृदय, आईचे दूध त्याचप्रमाणे गर्भातही आढळले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top