सांगली – जीबीएस अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराने आता सांगली जिल्ह्यातही शिरकाव केला आहे. जिल्ह्यात जीबीएस आजाराने त्रस्त असलेल्या तीन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला व्हेंटीलेटरवर ठेवले आहे. ‘जीबीएस’चे रुग्ण आढळल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
सांगलीतील चिंतामणीनगर तसेच वाळवा तालुक्यातील मर्दवाडी येथील दोन रुग्ण, तर कोल्हापूर जिल्ह्यातील गुडमुडशिंगी येथील एका रुग्णावर सांगलीत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघांपैकी एक रुग्ण व्हेंटीलेटरवर आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चिंतामणीनगर येथे ४०० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र लक्षणे असलेली एकही व्यक्ती आढळली नाही. चिंतामणीनगरचा ४५ वर्षांचा रुग्ण अजमेर, आग्रा येथून ११ जानेवारी रोजी सांगलीत आला आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरू नये, लक्षणे आढळल्यास रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ.वैभव पाटील यांनी केले आहे.
सांगलीत ‘जीबीएस’ चा शिरकाव तीन रुग्ण रुग्णालयात दाखल
