सांगली – सांगलीतील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आज व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सांगली-कोल्हापूर महामार्ग रोखला. यावेळी विक्रीसाठी आणलेला कांदा महामार्गावर फेकला. बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी प्रती क्विंटल अडीच ते पाच हजार रुपये इतका दर पाडला.वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केलीयावेळी तब्बल एक तास महामार्गावरील वाहतूक शेतकऱ्यांनी रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील बाजार समितीमध्ये जाणूनबुजून व्यापाऱ्यांकडून कांद्याचे दर पाडले जात आहेत. इतर जिल्ह्यांत दर चांगले मिळत असताना सांगली जिल्ह्यात मात्र व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
सांगलीत कांद्याचे दर पाडल्याने शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला
