सांगली- मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जिवाची बाजी लावून भारतीय नागरिकांचे रक्षण करणाऱ्या शहीद पोलीस जवान, सैन्य दल व निष्पाप नागरिकांना अभिवादन करण्यासाठी शहीद अशोक कामटे स्मृति फाऊंडेशनच्या वतीने सांगली येथून ‘शहिद दौड’ चे आयोजन करण्यात आले आहे. सांगली ते मुंबई अशी ४७० किलोमीटर अंतराची ही ‘शहीद दौड’ उद्या मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती सांगली जिल्हा विकास संघाचे संस्थापक संभाजी लोखंडे यांनी दिली.
भारत देशाचा तिरंगा ध्वज हाती घेत ५० धावपटू यामध्ये सहभागी झाले आहेत. देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या पराक्रमाची व त्यागाची गाथा नव्या पिढीला प्रेरणादायी ठरावी हा या शहीद दौडचा उदेश आहे. ही शहीद उद्या सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पांजरपोळ चेंबूर येथे पोहचणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ती अमर सिनेमा, घाटला, आचार्य कॉलेज, चेंबूर स्टेशन, डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस आणि सुमन नगर येथे थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायन मार्गाने गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना होईल. २६ नोव्हेंबर रोजी शहीद दौडचा समारोप होईल. मुंबईकर नागरिकांनी भारत देशाचे नागरिक म्हणून दौंड मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संभाजी लोखंडे यांनी केले आहे.