सांगली-कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील सुपुत्र,लष्करी जवान स्वप्निल हणमंत साळुंखे (३२) यांचा गावी सुट्टीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ढालेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्वप्निल साळुंखे हे बारा वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झाले होते.सध्या ते पंजाबमधील पठाणकोट या ठिकाणी सेवेत होते. दहा दिवसापूर्वी ते कुटुंबीयांना घेऊन सुट्टीवर आले होते. सुट्टीवर आल्यावर भिवंडी मुंबई येथे ते कुटुंबीयांसमवेत राहत होते. रविवारी ते फिरायला गेले असता स्वीमिंग टँकमध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या निधनाने ढालेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,आई व भाऊ असा परिवार आहे. आज सकाळी आठ वाजता ढालेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.