सांगली- खानापूर तालुक्यातील कार्वे येथे बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भांडणाचा राग मनात धरून एका कुस्तीगीराची निर्घृण हत्या करण्यात आली.राहुल गणपती जाधव (३५) असे या मृत कुस्तीगीराचे नाव आहे.
याप्रकरणी विटा पोलिसांनी माणिक परीट,गजानन शिंदे व नयन धाबी या तिघा संशयितांना अटक केली असून अन्य हल्लेखोरांच्या शोधासाठी सर्वत्र पथके रवाना केली आहेत. राहुल जाधव यांच्या मालकीचा विटा एमआयडीसीमध्ये कार्वे हद्दीत हॉटेल आणि बार आहे. बुधवारी रात्री संशयित मारेकरी हे राहुल यांच्या हॉटेलमध्ये गेले होते. तिथून ते राहुल यांना घेऊन मंगरूळ रस्त्यावरील दुसर्या एका हॉटेलवर गेले. तिथेच त्यांनी राहुल यांच्याशी भांडण सुरू केले.त्यानंतर राहुल हे मोटारीतून परतत असताना विटा-तासगाव मार्गावरील स्मशानभूमीसमोरील पुलाजवळ हल्लेखोरांनी त्यांना रोखले. त्यांनी राहुल यांच्या मोटारीच्या काचा फोडल्या आणि त्यांना बाहेर ओढून त्यांच्यावर तलवार, गुप्तीसारख्या शस्त्रांनी सपासप वार केले. त्यांच्यावर डोक्याच्या मागच्या बाजूला वार केले. मोटारीत राहुल यांच्यासोबत असलेल्या काळबागे यांनाही मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले.तर या मारहाणीत राहुल यांचा जागीच मृत्यू झाला.
सांगलीच्या कार्वे गावातील कुस्तीगीराची निर्घृण हत्या
