कराड – विदर्भाबाहेर असलेला महाराष्ट्रातील एकमेव सह्याद्री व्याघ्रप्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात वसलेला आहे.या प्रसिद्ध सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आधीच एक पट्टेरी वाघ असताना आता नव्या वाघाचे आगमन झाले आहे. हा वाघ ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला असून तो नर जातीचा आहे.या नव्या पट्टेरी वाघाची ओळख पटलेली नाही.त्यामुळे त्याचे नामकरण ‘एसटीआर-१’ असे करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एका पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळून आले होते. २०१८ नंतर प्रथमच गेल्यावर्षी १७ डिसेंबर रोजी या वाघाची या प्रकल्पात नोंद झाली होती.त्यानंतर आता नव्या वाघाचे आगमन झाले आहे.या नर वाघाचे छायाचित्र कॅमेऱ्याने टिपले आहे. विशेष म्हणजे या वाघाची ओळख पटली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यातून हा वाघ सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानात आला आहे.