प्रयागराज – उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सध्या सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चित्रविचित्र वेशभूषा केलेले साधू-संत आकर्षणाचे विषय ठरत आहेत. अशाच एका साधूची त्याच्या अंगावर असलेल्या सोन्याच्या दागिन्यांमुळे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अंगावर तब्बल सहा कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने वागवणाऱ्या या साधूला गोल्डन बाबा म्हटले जात आहे.
हाताच्या दहाही बोटांमध्ये सोन्याच्या जाडजूड अंगठ्या, गळयात सोन्यात गुंफलेल्या रुद्राक्षांच्या माळा, मनगटाला सोन्याची जाडजूड कडी अशा अवतारातील हे साधू महाराज चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांच्या अंगावर सुमारे चार किलो सोन्याचे दागिने आहेत. त्यांची बाजारभावानुसार किंमत ६ कोटींच्या आसपास आहे. ६७ वर्षीय हे महाराज निरंजनी आखाड्यातील आहेत,असे सांगितले जात आहे.एस के नारायण गिरी महाराज असे त्यांचे नाव असून ते मूळचे केरळचे रहिवासी आहेत. आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने आपल्या साधनेशी निगडित आहेत,असे नारायण गिरी उर्फ गोल्डन बाबा सांगतात.