मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दकी यांना पोलीस सुरक्षा असतानाही त्यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी झटपट तपासाची सूत्रे हलवून धर्मराव राजेश कश्यप, गुरमैल बलजित सिंह या दोन आरोपींना अटक केली, तर मोहम्मद झिशान अख्तर आणि शिवकुमार हे दोन आरोपी फरार आहेत. सगळे आरोपी परप्रांतीय असून, राजेश कश्यप उत्तर प्रदेशातील बहराईचा, गुरमैल हरियाणाच्या कैथलचा, उर्वरित दोघे उत्तर प्रदेशातील आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी गुरमैल सिंह या आरोपीला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आज या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारल्याचा एक मेसेज समाजमाध्यमांवर झळकला.
बाबा सिद्दिकी यांच्यावर आज रात्री बडा कब्रस्तान स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांच्या मृतदेहाचे कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या
तपासाला पोलिसांनी आज वेग दिला. मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज सांगितले की, गुन्हे शाखेच्या वतीने 15 पथके या हत्येचा तपास करत आहेत. इतर राज्यांच्या पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. सिद्दिकी यांना कुठलीही श्रेणी नसलेली सुरक्षा मिळाली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी तीन हवालदार तैनात करण्यात आले होते. घटनेच्या वेळी एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होता. आरोपींकडून दोन पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या घटनेचा लॉरेन्स टोळीच्या दृष्टीकोनातूनही तपास केला जात आहे. समाजमाध्यावर फिरत असलेल्या पोस्टची आम्ही चौकशी करत आहोत.
बाबा सिद्दिकी हत्येची वेगवेगळी कारणे समोर येत होती. आज या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. लॉरेन्स बिष्णोई गँगला टॅग करत ‘शुभू लोणकर महाराष्ट्र’ नावाच्या युजरने सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेणारी ही पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, बिश्नोई गँगमधील एका सदस्याने ही पोस्ट शेअर केली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्यांचे बॉलीवूड, राजकारण, मालमत्ता व्यवहारातील दाऊद आणि अनुज थापन यांच्याशी असलेले संबंध. आमची कोणासोबतही दुश्मनी नाही. पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करेल, त्याचा आम्ही हिशेब नक्की करू. आमच्या गँगमधील कोणत्याही भाईला मारण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही प्रतिक्रिया नक्की देऊ. आम्ही याआधी कधीही वार केलेला नाही. अनुज थापन हा सलमान खानच्या घरावरील हल्ल्यातील एक आरोपी होता. त्याने पोलीस कोठडीत आत्महत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यामध्ये एका भाड्याच्या खोलीत राहत होते. आरोपींनी 14 हजार रुपये भाड्याने ही खोली घेतली होती. आरोपी अनेक दिवसांपासून सिद्दिकी यांची हत्या करण्याची संधी शोधत होते. एका डिलिव्हरी बॉयच्या मदतीने आरोपींना काही दिवस आधी शस्त्रे पुरवण्यात आली होती. बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करण्यासाठी आरोपी गुरमैल, धर्मराज आणि शिवकुमार हे घटनास्थळी रिक्षाने पोहोचले होते. शिवकुमार गुरमैल आणि धर्मराज यांच्यावर लक्ष ठेवून होता. हत्या करून पळून जाताना गुरमैल आणि धर्मराज यांना अटक केली. फरार शिवकुमार आणि चौथ्या आरोपीचा 5 राज्यांमध्ये तपास सुरू आहे. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्येही मुंबई पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या टीमकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडून गुरमैल, धर्मराजची चौकशी सुरू आहे. या हत्येची सुपारी शिवकुमारला देण्यात आली होती, असे पकडलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितल्याचे कळते.
दोन्ही आरोपींची आज वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना मुंबईच्या किला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील गौतम गायकवाड यांनी पोलिसांच्या बाजूने युक्तिवाद केला. तर वकील सिद्धार्थ आगरवाल यांनी आरोपींच्या बाजूने युक्तिवाद केला. आरोपी धर्मराज कश्यप याने आपण 17 वर्षांचे असल्याचा दावा केला. त्यानंतर सरकारी वकील गौतम गायकवाड यांनी आरोपींच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी गुरमैल सिंह याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर दुसर्या आरोपी धर्मराजला पोलीस कोठडी सुनावली नाही. धर्मराजची ऑसिफिकेशन टेस्ट करून पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिले. वयाचा मुद्दा कोर्टाने गांभीर्याने घेत आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. पोलीस ही चाचणी करून आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत. ती होईपर्यंत आरोपी धर्मराज कश्यप पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले. ते सिद्दिकी यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी कूपर रुग्णालयात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, राजकीय फायद्यासाठी आपापसात फूट पाडण्याची किंवा इतरांच्या दुःखाचा फायदा घेण्याची ही वेळ नाही. जोपर्यंत जबाबदार व्यक्तींना शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. विरोधकांनी या घटनेनंतर सरकारला धारेवर धरले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, सत्ताधारी नेत्यांसोबत अशी घटना घडणे म्हणजे कायद्याचा आणि पोलिसांचा धाक राहिलेला नाही. जर सत्ताधारी पक्षातील नेते सुरक्षित नसतील तर राज्य सुरक्षित कसे राहणार?
प्रवीण लोणकरला अटक
सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट ज्याच्या नावाने फिरत आहे, त्या शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला आज पुण्यातून अटक करण्यात आली. त्याचाही बिष्णोई टोळीशी काही संबंध आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत. सिद्दिकी हत्या प्रकरणातील ही तिसरी अठक आहे. तर शुभू म्हणजेच शुभम लोणकर हा अकोल्यातील अकोट येथील रहिवासी आहे. त्याला अकोला पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात शस्त्रास्त्र तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. त्याच्याकडून तीन पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यावेळी शुभमने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्याशी संबंध असल्याचे मान्य केले होते.