मुंबई – बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्या प्रकरणातील आरोपी अनुज थापन या पोलीस कोठडीत मृत्यू झाला. अनुजने आत्महत्या केली असा पोलिसांचा दावा आहे. मात्र पोलिसांचा हा दावा खोटा असल्याचे आरोपीच्या आईचे म्हणणे आहे.या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी,अशी मागणी अनुजची आई रिता देवी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली.मात्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला.
रिता देवी यांच्या याचिकेव न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अनुज थापन मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली असून चौकशी अहवालात अनुजने आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अहवालाच्या सत्यतेबाबत रिता देवी यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर न्यायालयाने या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज रिता देवी यांच्या वकिलांना दाखविण्याचे आदेश सरकारला दिले.
१ मे २०२४ रोजी अनुज थापन क्रॉफर्ड मार्केट येथील गुन्हे शाखेच्या कोठडीत असता त्याचा मृतदेह कोठडीतील शौचालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने पांघरण्यासाठी दिलेल्या चादरीचा वापर करून गळफास घेतला असा पोलिसांचा दावा आहे.