*केंद्रीय मंत्री नितीन
गडकरींचा विश्वास
उत्तर काशी- उत्तराखंडातील उत्तर काशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी सातत्याने बचावकार्य सुरू आहे.आज रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मदत आणि बचाव कार्याची पाहणी करण्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही उपस्थित होते. यावेळी सर्व प्रयत्न सुरळीत चालले,तर बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन ते अडीच दिवस लागतील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
गडकरी पुढे म्हणाले की, गेल्या सात-आठ दिवसांपासून आम्ही या मजुरांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.त्यांना जीवंत बाहेर काढणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.आम्ही येथे काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत दोन तास चर्चा केली.आम्ही सहा पर्यायांवर काम करत आहोत आणि भारत सरकारच्या विविध एजन्सी येथे काम करत आहेत.प्रामुख्याने पंतप्रधानांचे कार्यालय यावर विशेष लक्ष ठेऊन आहे.
बोगद्यातील तज्ज्ञ आणि बीआरओ अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे.आत अडकलेल्यांना अन्न,औषध आणि ऑक्सिजन पुरवणे हे आमचे प्राधान्य आहे. बीआरओकडून खास मशीन आणण्यासाठी रस्ते बांधले जात आहेत.अनेक यंत्रे येथे आली आहेत. बचावकार्यासाठी सध्या दोन ऑगर मशीन कार्यरत आहेत.या हिमालयीन भूभागात गुंतागुंत आहे. तरीही जर ऑगर मशीन योग्य प्रकारे काम करत असेल तर आम्ही पुढील दोन ते अडीच दिवसांत आत अडकलेल्या पोहोचता येईल,असे गडकरींनी सांगितले.