मुंबई – मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे संपूर्ण वातानुकूलित लोकलमध्ये रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच राज्य सरकारने ‘एमयूटीपी -3 अ’ (मुंबई शहरी वाहतूक) प्रकल्पासाठी सात हजार कोटींच्या कर्ज उभारण्यासाठी मंजुरी दिली. त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा वातानुकूलित करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने कंबर कसली.
पारंपरिक लोकलमधून वातानुकूलित लोकलमध्ये मुंबईकरांना योग्य पद्धतीने स्थलांतरित करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. राज्य सरकारने एका खासगी कंपनीला याचे काम दिले असून ही कंपनी वर्षभरात सर्वेक्षण अहवाल एमआरव्हीसीकडे सादर करेल. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्पात (एमयूटीपी) मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी एकूण 238 वातानुकूलित लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यात एमयूटीपी-3 मधील 47 आणि एमयूटीपी-3 अ मधील 191 वातानुकूलित लोकलचा समावेश आहे.
2019 पासून राज्य सरकारकडून प्रतिसाद नसल्याने हा प्रकल्प रखडला होता. राज्यात सत्तापालटानंतर राज्य सरकारने सुधारित प्रकल्पाला अर्थसाह्य उभारण्यासाठी मंजुरी देण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणीच्या प्रक्रियेला चालना मिळाली आहे. एमयूटीपी-3 आणि एमयूटीपी-3 अ अंतर्गत 238 वातानुकूलित लोकल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने आता फक्त केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
सर्वच लोकल एसी करणार? 7,000 कोटींची कर्जउभारणी
