ठाणे- शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे जिल्ह्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघात आपला अर्ज दाखल केला. प्रताप सरनाईक यांनी अर्ज भरतेवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती तब्बल २७१ कोटी १८ लाख ३९ हजार ६४७ रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत साधारण १२८ कोटी रुपये वाढल्याचे दिसत आहे.
ओवळा-माजिवडा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होणार आहे. कारण येथून ठाकरेंच्या शिवसेनेकडून नरेश मनेरा यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.प्रताप सरनाईक यांनी २०१९ च्या निवडणुकीवेळी त्यांची एकूण संपत्ती १४३ कोटी ९७ लाख १८ हजार ७४५ एवढी नमूद केली होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकांसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती २७१ कोटी १८ लाख ३९ हजार ६४७ रुपये एवढी दाखविण्यात आली आहे. त्यांच्या संपत्तीत साधारण १२८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम ८,१७,९६२ तर पत्नीकडे १६,४४,६०६ रुपये आहेत. तसेच जंगम मालमत्ता ५६,३०,९७,२८३ रुपये इतकी आहे. त्याचप्रमाणे सरनाईक यांच्याकडे १० लाख ४० हजाराचे शेअर्स,२२ लाख ५० हजारांचे सोने आहे. विशेष म्हणजे, २०२१ मध्ये सरनाईक यांच्यावर ईडीची धाड पडली होती. त्यावेळी त्यांचे सर्व कुटुंब काही दिवस बेपत्ता होते.