शिर्डी- आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू, तुम्ही फक्त आम्हाला निवडून आणा, असे आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना केले. कोपरगाव येथे जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.
उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा होता. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या संभाजीनगर, पैठण जाहीर सभा येथे सभा पार पडल्या. पैठणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांनी पक्ष प्रवेश केला. ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवात शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाने झाले. त्यानंतर ते कोपरगाव येथे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी होत असलेल्या अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. तसेच गेलेली सत्ता पुन्हा येईल. गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणणार, असा इशारा त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे.
कोपरगाव येथे जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशन बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला सत्तेची पर्वा नाही. मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. मला तुमच्या कुटुंबाची पर्वा आहे. सत्ता येत असते आणि जात असते. पण गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणणार आणि सर्वाना न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मात्र, एक लक्षात घ्या, एकजूट महत्त्वाची आहे. याआधी एकदा जुनी पेन्शन योजनेसाठी तुम्ही सर्व नागपूरला आला होतात. मात्र, तुमच्यापैकी एक घटक तिकडे गेला आणि तुमच्या आंदोलनावर पाणी ओतले. जे फोडाफोडीचे राजकारण शिवसेनेबरोबर करण्यात आले. तसेच हे जुनी पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्यांबरोबर देखील करतील. महायुतीच्या नेत्यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवले पाहिजे, असा निर्धार करायला हवा. विधानसभेची निवडणूक जवळ येईपर्यंत ज्यांना आपली बहीण माहिती नव्हती. त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. आता दोन महिन्यांनी निवडणुका आहेत. मी तुम्हाला वचन देतो की, आमचे सरकार आणा, मी जुनी पेन्शन योजना अंमलात आणतो. सरकारच्या योजना राबवणारे तुम्ही आहात, लोकांच्या घराघरात जाऊन तुम्ही सरकारचे काम करता, तरी योजनेच्या पोस्टरवर फोटो दाढीवाल्यांचे लागतात. आता मी ही घोषणा केल्यानंतर महायुतीला घाम फुटेल आणि ते ही तुमची मागणी कदाचित मान्य करतील. हा दगाफटका तुम्हाला नाही तर महाराष्ट्राला होणार आहे. पण तुम्ही एक लक्षात घ्या ज्यांनी माझ्याशी गद्दारी केली त्यांना मी कुटुंबातील मानले होते. ते विश्वासघात करू शकतात. मग ते तुमच्यावर वार करू शकणार नाहीत का? त्यामुळे मला हे सरकार नको आहे. मला मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न तेव्हाही नव्हते आणि आताही नाही. माझ्यासाठी मला माझा महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील जनता हीच माझी सत्ता आणि ताकद आहे.