मुंबई – महाराष्ट्र स्टेट पॉवर जेनरेशन प्लांट्स लिमिटेड (महाजेनको) ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. त्यामुळे मंत्रिपदावर असताना धनंजय मुंडे या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतात, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. तसेच वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावाने बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ४ सातबारे आहेत. जमिनीच्या खरेदीसाठी पैसे कोणी व कसे दिले याचीदेखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
अंजली दमानिया एक्स पोस्ट करत लिहिले की, धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या. वेंकटरश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे धनंजय मुंडे व राजश्री धनंजय मुंडे हे प्रमुख शेयरहोल्डर आहेत. या कंपनीत आधी वाल्मिक कराड संचालक होते. आजही ते शेयरहोल्डर आहेत. तसेच महाजेनकको ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे, असे असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो?
तर वाल्मिक कराडच्या दुसर्या पत्नीच्या नावाने असलेल्या जमिनीचा सातबाराचे फोटो एक्स पोस्ट केले आहेत. अंजली दमानिया एक्स पोस्ट करत म्हणाल्या की, वाल्मिक कराड ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती मंगल जाधव आहे असे काही माध्यमांनी दाखवले. ह्या त्याच ज्योती मंगल जाधव आहेत का ? त्यांच्या नावाचे हे सोलापुरातले हे ४ सातबारे आहेत. या ज्योति मंगल जाधव कोण आहेत, याचा तपास ईडीने करावा. या जमिनीचे कोणी पैसे दिले, याचा तपास झाला पाहिजे. जमिनी कोणी घेतल्या, पैसे कोणी व कसे दिले याचीदेखील चौकशी झाली पाहिजे.