मुंबई -समृद्धी महामार्गाचा आमने ते इगतपुरी दरम्यानचा ७६ कि.मी लांबीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.या टप्प्यातील ठाणे व नाशिक जिल्ह्याला जोडणाऱ्या बोगद्यांवर ऐतिहासिक वारली चित्रकला व लोकसंस्कृती झळकावून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संस्कृती संवर्धनाचा एक अनोखा प्रयत्न केला. अशा प्रकारे बोगद्यावर चित्रकला रेखाटण्याचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.समृद्धी महामार्गावरून ठाणे जिल्ह्यातील आमने इंटरचेंजहून प्रवासाची अनुभूती देण्यासाठी महामंडळाने बोगद्यांवर स्थानिक लोककलेची मुद्रा उमटवली आहे. डोंगर-दऱ्या व निसर्गाने नटलेल्या ठाणे व नाशिक जिल्ह्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गाच्या बोगद्यांवरील ही कलाकुसर सौंदर्यात अधिकच भर टाकत आहे.साधारणपणे एक ते दीड महिन्याचा कालावधी बोगद्यांवर चित्र रेखाटण्यासाठी लागला . या अत्यंत सुंदर कलाकृतीमुळे समृद्धी महामार्गावर प्रवास करताना वाहन चालकांवरील तणाव कमी होणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या बोगद्यांवर लोकसंस्कृतीची मुद्रा उमटणार
