मुंबई – समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसर्या टप्प्याचे आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या थाटात लोकार्पण केले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्गामुळे शेतकरी समृद्ध झाले. हा रस्ता शेतकर्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा आहे.
एकनाथ शिंदे या प्रसंगी म्हणाले की, आम्ही दिलेला शब्द पाळतो. ते आमचे कर्तव्यच आहे. आम्ही जे करतो ते जाहीरपणे करतो. काही लोकांप्रमाणे घरात बसून आम्ही चर्चा करीत नाही. ते बंद खोलीत वाकडे-तिकडे बोलायला मोकळे असतात. पण ते सर्व बाहेर येतेच. त्यावर मी बोलणार नाही. मेहनत, कष्टातून वेळेत प्रकल्प पूर्ण होतात. लोकांना हा महामार्ग स्वप्नवत वाटत होता, पण मला आणि फडणवीसांना खात्री होती की, तो पूर्ण होणारच. लोक सुरुवातीला विरोध करत होते. देवेंद्र फडणवीसांनी तसेच सर्व अधिकार्यांनी मेहनत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अडथळे, गैरसोय दूर केल्या. आपण तो पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्यामुळेच आज हा पाचशे वीस किलोमीटरचा महामार्ग होऊ शकला.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही या महामार्ग बांधणीतील अडथळ्याचा प्रवास सांगितला. ते म्हणाले की, ‘अनेक लोकांनी या महामार्गाला विरोध केला. उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरला सभा घेत महामार्ग होऊ देणार नाही. एकही इंच जमीन देणार नाही, असे म्हटले होते. शरद पवारांनीही असेच म्हटले होते. परंतु, त्यानंतर एकनाथ शिंदेंनी लोकांच्या भेटी घेतल्या, त्यानंतर गावागावांतील लोकांनी जमिनी दिल्या. देशातील हे रेकॉर्ड आहे की, 701 किमीचा संपूर्ण ग्रीनफिल्ड मार्गाची जमीन नऊ महिन्यात संपादित करून दाखवली.
दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या 82 किलोमीटर टप्प्याचे लोकार्पण आज झाले. त्यामुळे नाशिक ते शिर्डी जलगतीने पार होईल. या मार्गावर 23 भुयारी मार्ग, 7 मोठे पूल, 18 छोटे पूल आहेत. मात्र या 82 किलोमीटर मार्गावर तीन टोल असणार आहेत.
‘समृद्धी’मुळे शेतकर्यांची समृद्धी शिंदे-फडणवीसांकडून वाखाणणी
