नवी दिल्ली – देशाला धर्मनिरपेक्ष समान नागरी कायद्याची आवश्यकता असून
सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा सातत्याने पुरस्कार केल्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधून केलेल्या भाषणात आज त्यांनी धर्मनिरपेक्ष समान नागरी कायद्याची गरज पुन्हा व्यक्त केली आणि यावर चर्चा व्हावी असे ते प्रथमच म्हणाले. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले हे सलग 11 वे भाषण होते.
आपल्या 97 मिनिटांच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. समान नागरी कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आग्रह धरतांनाच त्यांनी पहिल्यांदा धर्मनिरपेक्ष समान नागरी कायदा हा शब्द वापरला. ते म्हणाले की, प्रत्येक धर्माचे वेगवेगळे कायदे असले तर समाजात फूट पडते. त्यामुळे देशाला धर्मनिरपेक्ष समान नागरी कायद्याची गरज आहे. या कायद्याने समाजातील दरी कमी होईल. या विषयावर व्यापक चर्चा होण्याची गरज आहे. देशातील 140 कोटी नागरिक एकजुटीने राहिले तर येणार्या प्रत्येक आव्हानावर मात करुन 2047 पर्यंत विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार होऊ शकेल. विकसित भारतातील सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असावा. लोकांना गरज असेल तेव्हाच सरकारने पुढाकार घ्यावा. देशात वारंवार निवडणुका होत राहिल्या तर विकासकामांकडे निवडणुकींच्या दृष्टीनेच पाहिले जाते. त्यामुळे एक देश, एक निवडणूक संकल्पना राबवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. निराशेच्या गर्तेत बुडालेल्या काही लोकांच्या नकारात्मक विचारसरणीमुळे देशाचे मोठे नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहायला हवे. देशातील सध्या सुरू असलेल्या परिवर्तनाचा सर्वाधिक लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचलेला आहे. देशाचा सर्वांगीण विकास हाच आपल्या सरकारच्या धोरणांचा आणि कार्यक्रमांचा केंद्रबिंदू असतो. आपल्या प्रयत्नामुळे देशाचे दरडोई उत्पन्न दुप्पट करण्यात सरकारला यश आले आहे. आपल्या देशातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरज पडू नये व मध्यमवर्गीयांवर खर्चाचा बोजा पडू नये यासाठी येत्या पाच वर्षांत वैद्यकीय प्रवेशाच्या 75 हजार नव्या जागा तयार करण्यात येतील. मी कोणत्याही राजकीय भावनेतून नाही तर राष्ट्र प्रथम या भावनेतूनच देशात सुधारणा घडवत आहे. बँकिंग क्षेत्रातील अनेक सुधारणा हे त्याचेच उदाहरण आहे. आज भारतीय बँका जगातील सर्वात मजबूत बँकांपैकी एक आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून देशात कौशल्यविकास घडवून आणणार असून या माध्यमातून भारताच्या कुशल मनुष्यबळाची ताकद जागतिक मनुष्यबळ बाजारपेठेत दाखवून देऊ. आधुनिक काळाची गरज ओळखून आपले सरकार विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रावर भर देऊन संशोधनाला पाठबळ देत आहे. आमचे सरकार कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी काम करत आहे. येत्या काळात जगाची सेंद्रीय खाद्यान्नाची मागणी भारत पूर्ण करेल. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसह देशातील उद्योगांनी मोठी प्रगती केली आहे.
ध्वजारोहणासाठी लाल किल्ल्यावर येण्याआधी पंतप्रधानांनी राजघाटवर जात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विविध देशांचे राजदूतही उपस्थित होते. अनेक देशांनी भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राहुल गांधी मागच्या रांगेत
लाल किल्ल्यावर झालेल्या मुख्य सोहळ्यासाठी देशात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या 4 हजार विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे पहिल्यांदा या सोहळ्याला उपस्थित राहिले. गेल्या दहा वर्षात विरोधी पक्षनेते या सोहळ्याला उपस्थित राहिले नव्हते. राहुल गांधी यांना निमंत्रितांच्या मागील रांगेत बसवण्यात आल्याने विरोधी पक्षांकडून तसेच समाज माध्यमावरुनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.