सफाई कर्मचारी संपावर गेल्याने
पॅरिसच्या रस्त्यावर ५६०० टन कचरा

पॅरिस: फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांपासून सफाई कामगार संपावर आहेत. त्यामुळे फ्रान्स ची राजधानी पॅरिससह येथील अनेक शहरांमध्ये कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसत आहेत. राजधानी पॅरिसच्या रस्त्यांवर तर ५ हजार टनांपेक्षा जास्त कचरा पसरला आहे. नवीन पेन्शन योजनेंतर्गत निवृत्तीचे वय वाढवण्यास देशातील मोठ्या संख्येने लोक विरोध करत आहेत. या आंदोलनात स्वच्छता कर्मचारीही सहभागी झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून लोक याविरोधात आंदोलन करत आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात या निदर्शनांमध्ये सहभाग आहे.

सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचे विधेयक ११ मार्च रोजी फ्रान्स संसदेत मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकांतर्गत निवृत्तीचे वय ६२ वरून ६४ करण्याचा प्रस्ताव आहे. यावर संयुक्त समिती गुरुवारी १६ मार्च ला या विधेयकाचा आढावा घेणार आहे. संयुक्त समितीने या विधेयकाला हिरवा कंदील दिल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहात अंतिम मतदान होईल. त्याआधारे नवी पेन्शन योजना लागू करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Scroll to Top