नाशिक – वणी येथील श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या घाट रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाय योजना केली जाणार आहे. या कामासाठी सोमवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत असा पाच तास नांदुरी ते सप्तशृंगी गड घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४ कळवणच्या सहाय्यक अभियंता रोहिणी वसावे यांनी दिली आहे.
सप्तश्रृंगी गडावर श्री सप्तश्रृंग निवासीनी देवी नवरात्र उत्सव ३ ते १२ ऑक्टोबर तसेच कोजागिरी पौणिमा १६ व १७ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. त्याअनुषंगाने, सहाय्यक अभियंता श्रेणी १ सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४ कळवण नाशिक यांनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत सप्तश्रृंगीगड ते नांदुरी या रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना हाती घेतली आहे. त्यामध्ये जाळी बसविणे व बॅरियर बसविणे हे काम प्रगतीपथावर असल्याने या रस्त्यावर सैल खडक दरड काढण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने व नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी २३, २५ व २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होत.मात्र येथील उर्वरित मलबा काढण्यासाठी आणखी एक दिवस वाहतुक बंद ठेवण्याची गरज होती.त्यामुळे या आणि इतर कामांसाठी रविवारी सप्तशृंगी गड घाट रस्त्यावरील वाहतुक बंद राहणार आहे.