नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. आझम खान यांची प्रकृती स्थिर असून ते निरीक्षणाखाली आहेत. आझम खान यांना रविवारी रात्री ३ वाजता सर गंगाराम रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले. आझम यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
रविवारी संध्याकाळी इफ्तारनंतर आझम खान यांची तब्येत बिघडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेश सरकारचे माजी मंत्री आणि सपा नेते आझम खान यांना गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खान यांच्या हृदयावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केल्यानंतर हृदयात स्टेंट टाकण्यात आला. आझम खान हर्निया आणि गँगरीनच्या समस्येशीही झुंजत आहेत.