सनातन हिंदू धर्म की जय!फडणवीसांची दहीहंडीवेळी घोषणा

ठाणे- आज मुंबई, ठाणे, पुणे येथे दहीहंडी उत्सवानिमित्त गोविंदा पथकांनी उंचचउंच थर लावण्याची स्पर्धाच केली. जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने यंदाही 10 थर लावण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या टेंभी नाका व इतर दहीहंडी कार्यक्रमांना भेट दिली आणि महायुतीच विजयाची दहीहंडी फोडणार अशी घोषणा केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेत आ. प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती दहीहंडी कार्यक्रमात भाषण करताना ‘सनातन हिंदू धर्म की जय’ अशी घोषणा दिली.
मुंबई आणि ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरात आज गोविंदा पथकाने थरावर थर रचून दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. जोगेश्वरीचे जय जवान गोविंदा पथक आणि कोकण नगर गोविंदा पथकाने 9 थर लावून आपल्याच विक्रमाची बरोबरी केली. दिवसभरात गोविंदा पथकांच्या चढाओढीत 106 गोविंदा जखमी झाले. त्यातील 74 जणांना
उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर 17 जणांवर रुग्णालयांत उपचार चालू होते. गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय मॉल परिसरात पाच थर लावताना स्वस्तिक महिला गोविंद पथकाचे थर कोसळले. त्यात तीन महिला गोविंदा जखमी झाल्या.
विक्रोळीच्या टागोरनगर येथे जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने 9 थर लावून सलामी दिली, तर ठाण्यातील वर्तक नगर येथे संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात कोकण नगर गोविंदा पथकाने नऊ थरांची यशस्वी सलामी दिली. या दोन्ही पथकांनी आपल्या व्रिकमाची बरोबरी करत दहीहंडी उत्सवातील आपले वर्चस्व कायम ठेवले. दादरमधील आयडियल गल्ली, वरळीच्या जांबोरी मैदानातील परिवर्तन दहीहंडी, ठाण्यात संकल्प प्रतिष्ठान, घाटकोपरचे भाजपाचे आमदार राम कदम यांची दहीहंडी उत्सव, मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्टची दहीहंडी, ठाण्यात स्वामी प्रतिष्ठान, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दहीहंडी म्हणून टेंभी नाका दहीहंडी उत्सवात सकाळपासून गोविंद पथकांनी थरांची सलामी दिली. दादरच्या आयडियल गल्लीची दहीहंडी दरवर्षीप्रमाणे महिला गोविंदा पथकाने फोडली.
भांडूप येथे भाजपाचे नेते दीपक दळवी यांनी आयोजित केलेल्या उत्सवात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी चार थरांवर चढून हंडी फोडली. अमर चक्र गोविंदा पथक मालवणीचा राजाने मालवणी पश्चिम येथील 8 थर रचले. मागाठाण्यातील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उत्सवात नृत्यांगंना गौतमी पाटील यांनी हजेरी लावून आपले नृत्य सादर केले. तिने इतर अनेक दहीहंडी उत्सवात आपले नृत्य केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वेगवेगळ्या दहीहंडी उत्सवांच्या व्यासपीठांवर उपस्थिती लावून गोविंदांना शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदे यांनी आपल्या टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. त्यावेळी अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी उपस्थिती लावून गोविंदाचा उत्साह वाढवला, दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरळीच्या जांबोरी मैदानातील भाजपाच्या परिवर्तन दहीहंडी उत्सवात दाखल झाले. त्यावेळी आमदार आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हेदेखील उपस्थित होते. फडणवीसांनी व्यासपीठावरच हंडी फोडली.
त्यावेळी एका गोविंदा पथकाने थर लावून औरंगजेबाच्या वधाचा देखावा सादर केला. त्यानंतर फडणवीस घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात पोहोचले, तर एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या उत्सवात पोहोचले. त्यांनी या उत्सवाचा आनंद लुटत गोविंदांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top