वॉशिंग्टन- पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी घोषणा केली की, ते भारताला एफ -35 ही अमेरिकन बनावटीची लढाऊ विमाने विकणार आहेत. या एका विमानाची किंमत 712 कोटी रुपये आहे. मात्र ही विमाने सदोष असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण खात्याने यापूर्वी सांगितले आहे. ट्रम्प यांचे निकटवर्ती एलन मस्क यांनीही यापूर्वी ही विमाने कुचकामी आहेत, या विमानाचे अपघात होऊन अनेक मृत्यू होऊ शकतात, त्यापेक्षा ड्रोन वापरणे बरे असे ट्विट केले होते. अशी ही सदोष लढाऊ विमाने विकत घेण्याचा अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे.
एफ-35 लाइटनिंग टू हे अमेरिकन विमान उत्पादक कंपनी लॉकहिड मार्टिनने विकसित केलेले पाचव्या पिढीतील हे लढाऊ विमान आहे. ही विमाने 2006 साली पहिल्यांदा आकाशात झेपावली होती. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली ही विमाने अत्यंत मारक म्हणून तयार केली होती. ती कोणत्याच रडारवर सापडत नाहीत. त्यामुळे सर्वोत्तम आहे, असा अमेरिकेचा दावा आहे. मात्र ही विमाने सदोष आहेत हे लक्षात येताच स्वतः ही विमाने वापरण्यापेक्षा अमेरिकेने मित्रदेशांना ही विमाने विकण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, नेदरलॅण्ड, दक्षिण कोरिया, इस्रायल, नॉर्वे आणि इटली या देशांचा अमेरिकेने एक हजार विमाने विकली आहेत. या एका विमानाची किंमत 712 कोटी रुपये आहे. या विमानाच्या अपघातांचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे. 2018 पासून या विमानाचे आतापर्यंत 12 वेळा अपघात झाले आहेत. या विमानांची विश्वासार्हता, देखरेख आणि व्यवस्थापन याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता भारताने ही विमाने विकत घ्यावी यासाठी दबाव आणला जात आहे.
पेटागॉनच्या एका अहवालामध्ये म्हटले आहे की, ही विमाने अपेक्षित क्षमतेने काम करत नाहीत. अमेरिकेच्या वायूदलात असलेल्या एफ-35 विमानांपैकी 50 टक्क्यांहून अधिक विमानांची उड्डाण करण्याची क्षमता नाही. त्यांना अपेक्षित टार्गेट पूर्ण करता आलेली नाहीत. एफ-35 मध्ये एकूण 65 दोष आहेत. या विमानात बिघाड झाल्यास ते विमान दुरुस्त करण्यासाठी तब्बल 172 दिवस लागतात. आणखी एका अहवालानुसार एफ-35 विमानाची रचना खूप गुंतागुंतीची आहे. या विमानात मोठ्या प्रमाणात डेटा प्रोसेसिंग होते. त्यामुळे वैमानिकही थकून जातात. अनेकदा या विमानाची महत्त्वाची यंत्रणाच बंद पडते. मे 2020 मध्ये एक विमान अमेरिकेतील एग्लिन एअरफोर्स बेसवर उतरताना कोसळले होते. ऑक्सिजन सिस्टमच्या डिझाईनमध्ये समस्या, विमानामधील गुंतागुंत आणि हेड माऊंटेड डिस्प्लेमधील दोषामुळे फ्लाईट कंट्रोल सिस्टीम निकामी होणे, हे या अपघातामागचे कारण असल्याचे उघड झाले होते. पंधरा दिवसांपूर्वी अलास्कामध्येही हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते.
ट्रम्प यांचे विश्वासू उद्योगपती स्पेस एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत एफ-35 वर टीका केली होती. छोटे ड्रोन आणि एफ-35 विमान यांची तुलना करणाऱ्या या व्हिडिओत मस्क यांनी लिहिले होते की, अजूनही काही लोक वैमानिकाकडून चालवली जाणारी लढाऊ विमाने तयार करत आहेत. ड्रोनच्या युगात ही विमाने कालबाह्य झाली आहेत. यामुळे केवळ वैमानिक मारले जातील. पायलेट असलेली विमाने ही मिसाईल हल्ले आणि बॉम्बहल्ल्यांसाठी सर्वात कमी परिणामकारक ठरतात. त्यापेक्षा ड्रोन कोणत्याही वैमानिकाशिवाय तेच काम करू शकतात.
एफ-35 च्या एका विमानाची किंमत 712 कोटी रुपये इतकी आहे. या विमानाच्या एका फेरीसाठी 36 हजार अमेरिकन डॉलरचा खर्च होतो. भारतीय चलनामध्ये ही रक्कम 31 लाख रुपये इतकी होते. म्हणजेच हे विमान एकदा उडवण्यासाठी 31 लाख रुपये खर्च होतात. हे विमान पडले की, 694 ते 1303 कोटींचे नुकसान होते. त्यामुळे भारताने ही विमाने खरेदी केल्यास ती पांढरा हत्ती ठरतील.
या विमानाची सहावी जनरेशन अमेरिकेत वापरली जात आहे. सातव्या जनरेशनसंबंधी काम सुरू आहे. या परिस्थितीत भारतासोबत पाचव्या जनरेशनच्या विमानांचा करार होणार असल्याचे समजते. बंगळुरूच्या एअरो शोमध्ये रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांची पाचव्या जनरेशनची लढाऊ विमाने सहभागी झाली होती. या दोघांमध्ये रशियाचे विमान उजवे असताना अमेरिकेने आपली लढाऊ विमाने विकत घेण्याची भारताला ऑफर दिली आहे.
सदोष लढाऊ विमाने विकत घेणार? डोनाल्ड ट्रम्पनी भारतावर दबाव टाकला
