मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शाह आज निवृत्त झाले. या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली. ‘मी निवृत्त होणाऱ्यांमधला नाही. मी माझ्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करेन. मी अशी प्रार्थना करतो की मला या नव्या इनिंगसाठी ईश्वर शक्ती देवो’, असे शाह म्हणाले.
सत्तासंघर्षांवर निर्णय देणाऱ्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठात न्यायमूर्ती शाह यांचाही समावेश होता. आपल्या शेवटच्या भाषणात बोलताना शाह भावुक झाले होते. त्यांनी राज कपूर यांच्या चित्रपटातील ‘जीना यहाँ, मरना यहाँ’ गाण्यातील “कल खेल में, हम हो ना हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा” या ओळी नमूद केल्या. दरम्यान, यावेळी त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. ‘माझ्या कार्यकाळात जर मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यासाठी बिनशर्त दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून ते जाणूनबुजून झालेले नाही. मी नेहमीच माझ्या कामाची पूजा केली आहे. तुम्हा सर्वांकडून मिळालेल्या प्रेमामुळे मला भरून आले आहे. मी बार आणि रजिस्ट्रीच्या सर्व सदस्यांचा आभारी आहे. माझा सपोर्ट स्टाफ आणि माझ्या निवासस्थानावरील कर्मचारी वर्गाचाही मी आभारी आहे’, असेही ते म्हणाले.