सातारा – सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोसळणाऱ्या पावसामुळे गुरुवारी पहाटे सज्जनगड मार्गावर मोठी दरड कोसळली. दरड कोसळल्याने काही तासांसाठी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. दरड हटवल्यानंतर दुपारी वाहतूक पूर्ववत झाली.
साताऱ्यातील सज्जनगड बस स्टँडपासून काही अंतरावर पहाटे मोठी दरड कोसळली. दरडीबरोबर चिखल आणि छोटी झाडे मोडून खाली आली. दरड कोसळल्याने सज्जनगड मार्गावरील संपूर्ण वाहतूक सकाळपासून ठप्प झाली होती. प्रशासनाने तातडीने दरड हटविण्याचे काम हाती घेतल्याने दुपारनंतर वाहतूक सुरू झाली. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या भागात धबधबे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे यवतेश्वर, सज्जनगड, ठोसेघर, केळवली, तापोळ्याकडे जाताना पर्यटकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.