सचिन पायलट नवा पक्ष काढण्याच्या तयारीत

जयपूर- राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट नवा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत. राजस्थान काँग्रेसमधील गृहयुद्ध आता काँग्रेस पक्षाच्या फुटीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. सचिन पायलट व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात समन्वय साधण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींना अपयश आल्याचे बोलले जात आहे. यामुळे सचिन पायलट ‘प्रोग्रेसिव्ह काँग्रेस’ नावाचा नवा पक्ष काढू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पायलट हे ११ जून रोजी जयपूरमध्ये सभा घेऊन हजारो समर्थकांच्या उपस्थितीत नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा करणार असल्याची चर्चा आहे.
सचिन पायलट गेल्या काही काळापासून सरकारविरोधी आंदोलन चालवत आहेत. त्यामुळे ते नक्की काय करतील याचा अंदाज लागत नसला तरी पक्षातून फुटून बाहेर पडण्याची शक्यता दिसत होती. दरम्यानच्या काळात गेहलोत आणि पायलट यांच्यात समेट घडवून आणण्यात काँग्रेस श्रेष्ठींना अपयश आल्याचे बोलले जाते. त्यामुळे पायलट यांनी नवा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. एवढेच नव्हे, तर ‘प्रोग्रेसिव्ह काँग्रेस’असे पक्षाचे नवे नावही त्यांनी निश्चित केले आहे. या नव्या पक्षाची घोषणा ११ जून रोजी जयपूरमध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दिवशी सचिन यांचे वडील राजेश पायलट यांची पुण्यतिथी आहे. दरम्यान, काँग्रेस हायकमांडने यापूर्वी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांना दिल्लीत बोलावून भेट घेतली होती. तेव्हा कॉंग्रेस नेत्यांनी सचिन पायलट आणि अशोक गेहलोत एकत्र काम करतील, असा दावा केला होता. यानुसार सचिन पायलट यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, सचिन पायलट गटाने हा दावा फेटाळून लावला आणि आपण आपल्या मुद्द्यांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top