मुंबई – विविध मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला होता.या संपामुळे तीन दिवसांपासून आरटीओ कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.अखेर प्रशासनासोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने हा संप मागे घेतल्याचे आरटीओ कर्मचारी संघटनेने सांगितले.
आरटीओ कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला होता. गुरुवारी परिवहन आयुक्त कार्यालयात सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत संघटनेच्या मागणीनुसार ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत वरिष्ठ लिपिक ते कार्यालय अधीक्षकपदांचे सेवाप्रवेश नियम अंतिम करण्यात येतील, तोपर्यंत पात्र कर्मचाऱ्यांना तदर्थ पदोन्नती देण्यात येईल,असे स्पष्ट केले.महसूल विभागानुसार बदल्या करण्याचे धोरण रद्द करण्यात आले असून पूर्वीप्रमाणेच बदलीकरिता पूर्वीप्रमाणेच १५ विभागांतर्गतच बदल्या करण्याचेही मान्य केले. त्यानुसार संप मागे घेण्यात आल्याचे कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी सांगितले.