संभाजी महाराज-येसूबाई यांचे लेझीम नृत्य! ‘छावा’ला विरोध! शिवप्रेमी आक्रमक

मुंबई- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ’छावा’या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने या चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी येसूबाई यांच्या लेझीम नृत्यावर आक्षेप घेत त्याला विरोध केला आहे. ही दृश्‍ये चित्रपटातून वगळली नाही, तर तो प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे वाद उफाळला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपट प्रदर्शन करण्यापूर्वी इतिहासकारांना दाखवण्याची मागणी केली.
विकी कौशल आणि रश्‍मिका मंदाना यांची भूमिका असलेला आणि लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांवरील हा भव्यदिव्य असा चित्रपट असल्याने त्याची चर्चा होत आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चाने चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांबाबत चुकीचे व काल्पनिक प्रसंग दाखवल्याचा आरोप करत विरोधातआंदोलन पुकारले आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज व येसूबाई यांच्याबाबत नृत्याचे आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे पुणे शहर समन्वयक सचिन अडेकर याबाबत म्हणाले की, जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात कधीच स्त्री अथवा नर्तकी नाचली नाही. मात्र, चित्रपटात राज्याभिषेक सोहळ्यात छत्रपती संभाजीराज आणि महाराणी येसूबाई नृत्य करताना दाखवले आहेत. लेझीम हे महाराष्ट्राचे नृत्य असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर नऊ महिन्यांनी आपल्या राज्याभिषेक सोहळ्यात छत्रपती संभाजी महाराज असे नृत्य करतील, याची कल्पनाही करता येणार नाही. केवळ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले असून, त्याला आमचा विरोध आहे. हा खोटा आणि काल्पनिक इतिहास आहे. हे गाणे आणि नृत्याची दृश्‍ये चित्रपटातून वगळावी. अन्यथा मराठा समाज व शिवप्रेमी हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाहीत. हे आंदोलन वाढू नये, याची काळजी चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि सरकारने घ्यायला हवी.
माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत सावध भूमिका घेत म्हटले की, ‘छावा’ सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांची संपूर्ण टीम मला मुंबईत भेटली होती, तेव्हा त्यांनी मला सिनेमाचा ट्रेलर दाखवला होता. पण मी त्यांना सांगितले की, मला संपूर्ण सिनेमा पाहायचा आहे. आपण या सिनेमावर इतिहासकारांची मते जाणून घेऊ. त्यांनी काही दुरुस्ती सुचवल्या तर त्या सुधारून सिनेमा जगभरात पोहोचवता येईल. त्यांच्याकडून मला अद्याप काही प्रतिसाद मिळालेला नाही. पण ट्रेलरमध्ये असे दिसत आहे की, छत्रपती संभाजी महाराज लेझीम नृत्य करतात. लेझीम हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. लेझीम खेळणे चुकीचे नाही. पण ते दृश्‍य कोणत्या संदर्भासह चित्रपटात दाखवले जाते हे पाहणे महत्त्वाचे आहे. एखाद्या ऐतिहासिक घटनेवर सिनेमा तयार करताना लेखक किंवा दिग्दर्शकांनी चित्रीकरण व दृश्‍ये करताना निर्मिती स्वातंत्र्य किती घ्यायचे याला काही सीमा असल्या पाहिजेत. या मुद्यावर ज्यांना इतिहासाचे सखोल ज्ञान आहे,अशा व्यक्तींनी एकत्र चर्चा व्हायला हवी. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर भव्य चित्रपट येत आहे, याचा आनंद आहे. हा चित्रपट महाराष्ट्रासह जगभरात पोहोचणे महत्त्वाचे आहे. माझी लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी इतिहासकार आणि या विषयातील जाणकारांशी चर्चा करावी.
अनेक टीव्ही मालिका आणि नाटकात संभाजी महाराजांची भूमिका करणारे अभिनेते आणि खा. अमोल कोल्हे म्हणाले की, चित्रपट पूर्ण पाहिल्याशिवाय त्यावर भाष्य करता येणार नाही. लेझीम हा महाराष्ट्राचा पारपंरिक नृत्य प्रकार आहे, त्यावरून वाद निर्माण होईल, असे मला वाटत नाही. छावा चित्रपटाच्या निमित्ताने संभाजी महाराजांचा इतिहास हिंदी चित्रपटातून योग्य पद्धतीने पोहोचवला जाणार असेल, तर चांगली गोष्ट आहे. त्याचे स्वागत करायला हवे, अशी माझी भूमिका आहे. मला व्यक्तिगत विचाराल, तर केवळ लेझीम नृत्य दाखवले म्हणून त्यावरून वाद होऊ नये. त्याचवेळी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास योग्य पद्धतीनेच मांडायला हवा. मी स्वराज्यरक्षक संभाजी मालिका करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या देदिप्यमान इतिहासावर अनेक वर्षांची जी काजळी चढवण्यात आली होती ती पुसून एक लखलखीत इतिहास समोर आणण्याचे काम केले होते. आता छावा चित्रपटातून त्याच्या पुढचे पाऊल टाकले जात असेल आणि छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास योग्य पद्धतीने दाखवला जात असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे. तर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी खंत व्यक्त केली की या पिढीला ऐतिहासिक चित्रपट करताना घेण्याची सवलत दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top