मुंबई – मुंबईतील एकेकाळी सर्वात श्रीमंत व्यक्तिंपैकी एक असलेले उद्योगपती रजनीकांत किलाचंद यांच्या मालमत्तेचे वाटप दोन महिन्यांच्या मुदतीत पूर्ण करा, असे सक्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रजनीकांत किलाचंद यांचे पुत्र हर्ष किलाचंद यांना दिले. मालमत्तेचे वाटप मुदतीत पूर्ण न केल्यास त्यांची मध्यस्थ म्हणून केलेली नेमणूक रद्द करण्यात येईल, असा सज्जड इशाराही न्यायालयाने हर्ष किलाचंद यांना दिला आहे.
रजनीकांत किलाचंद यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी मध्यस्थ किंवा निष्पादक म्हणून न्यायालयाने हर्ष किलाचंद यांची नेमणूक केली आहे. दिवंगत रजनीकांत किलाचंद यांनी आपल्या मृत्यूपत्रात नमूद केल्यानुसार त्यांच्या मालमत्तेचे वाटप हर्ष यांनी करणे कायद्याने बंधनकारक आहे. रजनीकांत यांच्या पत्नी रमिला आणि पुत्र अमरीश हे रजनीकांत किलाचंद यांचे अन्य वारसदार असून त्यांना मालमत्तेमध्ये रजनीकांत यांच्या इच्छेनुसार हिस्सा देणे ही जबाबदारी मध्यस्थ या नात्याने हर्ष यांच्यावर आहे. मात्र हर्ष किलाचंद यांनी मालमत्तेचे वाटप करण्याआधी रमिला आणि अमरीश यांना काही अटी घातल्या आहेत. त्या रमिला आणि अमरीश यांना मान्य नाहीत. त्यामुळे हर्ष यांनी मालमत्तेचे वाटप अद्याप केलेले नाही.
याबाबत रमिला यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नुकतीच या याचिकेवर न्या. एन जे जमादार यांच्या न्यायासनासमोर सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्यायालयाने हर्ष यांना रजनीकांत किलाचंद यांच्या सर्व मालमत्तेचे योग्य रित्या वाटप करण्यासाठी दोन महिन्यांची अंतिम मुदत दिली.
संपत्तीचे वाटप मुदतीत पूर्ण करा! हायकोर्टाने हर्ष किलाचंदला फटकारले
