नवी दिल्ली – संदेशखाली मधील महिलांचे लैगिंक शोषण, जमीन हडपणे व रेशन घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीचे कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले . उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ममता बॅनर्जी यांना हा एक मोठा झटका समजला जात आहे. परिणामी आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी होईल .संदेशखाली प्रकरणातील पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर सुनावणी आज न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के.वी. विश्वनाथन यांच्या पीठासमोर झाली. राज्य सरकारला या प्रकरणात इतका रस का आहे? सरकार कोणाला वाचवण्यासाठी हे करत आहे ?असा सवाल यावेळी न्यायलायाने उपस्थित केला. उच्च न्यायालयाच्या आदेशाने पोलीस दलाचे मनोबल खच्ची झाल्याची भूमिका पंश्चिम बंगाल सरकारने यावेळी मांडली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.