सोलापूर
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना आज सकाळी ७ वाजता नीरा नदी पात्रात स्नान घालण्यात आले. यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत सकाळी ८ वाजता आगमन झाले. यावेळी दोन जेसीबींच्या साह्याने पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
पुण्यातील सराटी व सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या दोन जिल्ह्यांची सीमा असलेल्या नीरा नदीत तुकोबांच्या पादुकांना स्नान घालण्याची परंपरा आहे. तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ऐवळे, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संत तुकाराम महाराज पालखी अकलूज मुक्कामी आल्यानंतर सकाळी गांधी चौक शेटे कॉम्पलेक्स येथील हिंदू, मुस्लीम व्यावसायिकांकडून गेल्या आठ दहा वर्षांपासून शाकाहारी चविष्ट दालचा भात नाष्ट्याची सोय करण्यात येते. रोजच्यापेक्षा वेगळ्या चवीचा नाष्टा घेऊन वारकरी पुढे मार्गस्थ होतात.