मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटायला तयार नाही. महाविकास आघाडीत काल विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि उबाठा गटात वाद झाल्याचे उघड झाले. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात खडाजंगी झाली. नाना पटोले असतील तर आम्ही जागावाटपाच्या बैठकीला येणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली होती. आज हा वाद मिटवण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबईत येऊन मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते म्हणाले की, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र आहोत. एकत्र लढणार आहोत. महाविकास आघाडीची तब्येत उत्तम आहे. या भेटीनंतर दुपारी ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची पुन्हा बैठक झाली.
महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याचे आणि लवकरच त्याची घोषणा होणार असल्याचे सांगितले जात होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात मतभेद असल्याचे उघड झाले होते. दोन्ही पक्षांनी ताठर भूमिका घेतल्याने जागावाटप रखडले. ठाकरे गटातील नेत्यांनी काल काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी संपर्क साधला होता. उद्धव ठाकरे यांनी तुटेपर्यंत ताणू नका, असा इशाराही दिला होता. संजय राऊत म्हणाले की मी जे बोलतो ते उध्दव ठाकरे यांची परवानगी घेऊनच बोलतो. त्यानंतर आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीवेळी काँग्रेसचे नेते नसीम खान आणि भाई जगताप उपस्थित होते. या भेटीनंतर रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे. उद्धव ठाकरे मध्यंतरी रुग्णालयात होते. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. त्यांची तब्येत आता उत्तम आहे आणि महाविकास आघाडीची तब्येतसुद्धा उत्तम आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत.
शरद पवार यांच्या भेटीनंतरही त्यांनी हाच सूर आळवत सांगितले की, जागावाटपाला उशीर झालेला नाही. युतीमध्ये निर्णयाला वेळ लागतो. एक दोन दिवसांत जागावाटपाचा मुद्दा संपेल. सध्या कुठलेही आरोप-प्रत्यारोप नाहीत. मुख्यमंत्रपदाची चर्चा निवडणुकीनंतर होईल.
दुपारी तीन वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, खा. अनिल देसाई, खा. संजय राऊत आणि जयंत पाटील हे उपस्थित होते. मात्र, त्याआधी संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली. संजय राऊत आपल्या कालच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, मी जे काही बोलतो ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका असते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतल्याशिवाय मी काहीही बोलत नाही. कोणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही, करणारही नाही. परंतु प्रादेशिक पक्षांना जास्त जागा मिळाव्यात असे मला वाटते. लवकरात लवकर उमेदवार यादी जाहीर व्हावी अशी अपेक्षा आहे. आज रात्री उशिरापर्यंत जागा वाटपाची चर्चा पूर्ण करु. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. चर्चेचा वेग कमी होता. आज पन्हा वाढेल. तिन्ही पक्षांत फार मोठे मतभेद नाहीत. आघाडीच्या राजकरणात अशा एखाद दुसर्या जागेवरुन चर्चा वाढत असते, असेही संजय राऊत म्हणाले. राऊत यांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, मेरिटवर जागावाटप होईल.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली की, महाराष्ट्रातील भिष्माचार्य (शरद पवार) या वादातून तोडगा काढतील. येत्या दोन दिवसात गोष्टी सुरळीत होतील. असे राजकारणात होत असते. प्रत्येक वाद हा झाला की उत्तर दिलेच पाहीजे, असे काही नाही. दोन दिवसांत चर्चा पूर्ण होऊन जागावाटप होईल.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात 250 हून अधिक जागांबाबत निर्णय झाला असून त्यात सर्वाधिक 100 हून जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. तर उद्धव ठाकरे गट 85 जागा लढवणार आहे. तर शरद पवार यांचा गट 75 जागा लढवणार आहे. विदर्भातील काही जागांवरून पेच आहे त्यात नागपुरातील दोन जागांचा समावेश आहे मुंबईतील 36 पैकी 33 जागांचा तिढा सुटला असून शिवसेना (ठाकरे) 18, काँग्रेस 15 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढणार आहे. समाजवादी पक्षाला 1 जागा देण्याचे निश्चित झाले असून कुर्ला, भायखळा आणि अणुशक्तीनगर या जागांवर तिढा आहे.
महायुतीचेही जागावाटप अडले
महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीचेही जागावाटप पुढे सरकले नाही. काल रात्री केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीतील नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतरही जागावाटप जाहीर झाले नाही. या बैठकीत अजित पवारांनी जास्त जागांचा आपला आग्रह सोडावा यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. अन्य राजकीय पुनर्वसनात जास्तीचा लाभ देण्याचे अजित पवारांना आश्वासन देण्यात आल्याचे कळते. या बैठकीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अमितभाईंबरोबर बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली. तिढा जास्त नाही. केवळ 30-35 जागांचा प्रश्न आहे. त्यात शेवटच्या टप्प्यात चर्चा होऊन एक-दोन दिवसांत जागावाटप होईल.तर उपमुख्यमंत्री म्हणाले की, जागावाटप जवळजवळ ठरले आहे. ज्या जागा निश्चित झाल्या आहेत, त्यांची त्या त्या पक्षाने आधी घोषणा करावी, असे ठरले आहे. त्यानुसार आमची यादी लवकरच जाहीर होईल. एक दोन दिवसांत कुठल्या पक्षाला किती जागा हेही कळेल.