संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात १० तरुणांवर मधमाशांचा हल्ला

ठाणे- जिल्ह्यातील येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ट्रेकिंगसाठी गेलेल्या १० तरुणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना काल घडली. या घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस कर्मचारी व टीडीआरएफ जवान आणि पालिकेच्या आपत्ती विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत या सर्व मुलांना सुरक्षितस्थळी नेऊन उपचार केले. यातील ७ जणांना त्यांच्या पाल्यांकडे सुपूर्द केले. तर ३ जणांवर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

डोंगरामध्ये अडकलेल्या या मुलांची नावे ऋषी घोसाळकर, समर्थ मयेकर, प्रणव परब, वरद बासा, सोहम देशमुख, कुणाल पानमंद, तन्मय नाईक, रोहन घरुड, अलोक यादव, आर्य यादव अशी हे सर्वजण १८ वर्षांचे आहेत. ही मुले मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग, कळवा येथे राहणारी आहेत. येऊर जवळच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरावर काल दुपारी १० तरुण ट्रेकिंगसाठी गेले होते. जंगलात ते रस्ता चुकले आणि जवळपास ४ किलोमीटर चालत गेले. यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी जोरदार हल्ला केला.मधमाशा चावल्याने ही मुले तिथेच अडकली होती. यापैकी एकाने वर्तकनगर पोलीस ठाण्यात फोन करून अडकल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब सूत्रे हलवली. ठाणे पालिकेचा आपत्ती विभाग व टीडीआरएफ जवानाच्या टीमने डोंगराकडे कूच केले. तब्बल दीड तासांच्या प्रयत्नांनंतर मुलांची सुखरूप सुटका केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top