मुंबई – मुंबईतील सात लोकल रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे.यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे.मात्र डोंगरीतील मुस्लीम रहिवाशांनी या नावाला विरोध करीत या स्थानकाला बाबा अब्दुल रेहमान शहा असे नाव देण्याची मागणी केली आहे.१० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील लोकल रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये बहुतांश स्थानकांना तेथील स्थानिक संस्कृती आणि संत-महात्म्यांची नावे देण्याचे ठरले. मात्र सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलताना ते डोंगरी असे करण्यात आले आहे. याला डोंगरीतील मुस्लीम समाजाने आक्षेप घेतला आहे.मुंबईतील मुस्लीम समाजामध्ये मानाचे स्थान असलेल्या जामा मशिदीचे ट्रस्टी शुऐब खातीब यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. शंभर वर्षांपूर्वी डोंगरी परिसरात मुस्लीम संत पीर सय्यद अब्दुल रेहमान शहा यांचे वास्तव्य होते.आजही त्यांची समाधी डोंगरीमध्ये आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाला जर जैन मुनी तिर्थंकर पार्श्वनाथ यांचे नाव दिले जाते तर सँडहर्स्ट रोड स्थानकाला पीर बाबा शहा यांचे नाव का नाही,असा सवाल खातीब यांनी उपस्थित केला. डोंगरीतील बहुतांश मुस्लिमांनीही अशीच भावना व्यक्त केली आहे.