जुन्नर- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या मानाच्या लाकडी पलंगाचे आगमन नुकतेच तालुक्यातील राजुरी येथे झाले.यादवकालीन परंपरेनुसार रविवारी सायंकाळी या पलंगाचे राजूरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी या पलंगावर फुलांची उधळण केली.
राजुरी येथील तिळवण तेली समाजातील कै. बाबुराव व आप्पा रामभाऊ विकास (मेहतर) या घराण्याकडे पलंगाची सेवा करण्याचा मान परंपरेने आहे.या पलंगाच्या मुक्कामाचे शेवटचे ठिकाण म्हणून राजूरीकडे पाहिले जाते. पलंगाची गावातून मिरवणूक निघताना सर्व भाविक,सेवेकरी आणि ग्रामस्थांनी घरोघरी रांगोळ्या काढल्या होत्या.तसेच मिरवणुकीत नऊ दुर्गाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. मिरवणुकीनंतर हा पलंग शिंदे यांच्या घरी दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर काल हा पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ झाला. सीमोल्लंघन सोहळा झाल्यानंतर सिंहाच्या गाभाऱ्यात याच पलंगावर तुळजाभवानी देवीची मुख्य चल मूर्ती निद्रेसाठी विराजमान केली जात असते.