सोलापूर- संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेले श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी सविस्तर आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार केला जात आहे. यासाठी राज्य सरकार आवश्यक तेवढा निधी देणार असून यासाठी १०० कोटींचा पहिला हप्ता मंजूर करत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते आज श्रीक्षेत्र अरण तालुका माढा येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार मेळावा व भक्तनिवास वास्तुशिल्प भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.
यावेळी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आदी उपस्थित होते. फडणवीस यावेळी म्हणाले की, संत सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती मार्गावर चालण्याचा एक वेगळा विचार दिला तसेच समाजाला एकसंघ ठेवण्याचे कार्य केले. आपल्या कर्मात मग्न असलेल्या सावता महाराजांना भेटण्यासाठी पंढरपूर येथून विठूरायाची पालखी अरण येथे येते ही घटना खूप महत्त्वाची आहे. शेकडो वर्षापूर्वी सावता महाराजांनी मांडलेले विचार आजही समाजाला दिशादर्शक ठरत आहेत. या विचारांची आजच्या समाजाला नितांत आवश्यकता आहे.