रामेश्वरम- श्रीलंकेच्या नौदलाने दोन यांत्रिक बोटीतून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या ९ भारतीय मासेमारांना अटक केली असून त्यांच्या बोटीही जप्त केल्या आहेत. मन्नारच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या एकूण ५३५ बोटींपैकी या २ बोटी जप्त केल्या आहेत.या वर्षी श्रीलंकन नौदलाने आतापर्यंत १८० भारतीय मासेमारांना अटक केली आहे.
या आधीही श्रीलंकन नौदलाने भारतीय मासेमारांना अटक करण्याच्या घटना घडल्या आहेत. जुलै महिन्यातच आतापर्यंत श्रीलंकेकडून आतापर्यंत एकूण २८ मासेमारांना अटक करण्यात आली आहे. १ जुलै रोजी रामेश्वरम बेटाच्या जवळ असलेल्या पाक च्या समुद्रधुनीतील पंबन मधून २६ मासेमारांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडील ४ देशी बनावटीच्या बोटीही जप्त करण्यात आल्या होत्या. गेल्या महिन्यातही १८ भारतीय मासेमारांना अटक करण्यात आली होती. मासेमारांना अटक करण्याच्या सर्वाधिक घटना या पाकच्या समुद्रीधुनीतच झालेल्या असून तमिळनाडू व श्रीलंकेमधील समुद्रातील या सागरी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात मासे आढळतात.