पालघर- शिंदे गटाकडून पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा जवळपास ३६ तासांपासून बेपत्ता होते. त्यानंतर मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास त्यांनी घरी येऊन कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र त्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा अज्ञात स्थळी निघून गेले.
याबाबत त्यांची पत्नी सुमन वनगा यांनी सांगितले की, तणावामुळे ते निघून गेले होते. आम्ही शोध घेतल्यानंतर ते रात्री घरी आले.त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते नातेवाईकांकडे गेले होते. त्यांना आम्ही समजावल्यानंतर ते घरी आले. कोणत्याही राजकीय नेत्यांशी त्यांचे काहीच बोलणे झालेले नाही. मुख्यमंत्री त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. ते घरात फक्त अर्धातास थांबून परत गेले.
मात्र घरी परतलेले वनगा आपल्या मित्रांसोबत परत कुठे गेले हे वनगा यांनी पत्नीलादेखील सांगितले नाही. तिकीट नाकारल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा यापुढे कोणती राजकीय भूमिका घेतात, याबद्दल उत्सुकता आहे.