श्रीनगर
श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावरील हंजवीरा पट्टण येथे आज सकाळी भारतीय लष्कराला एक आयईडी बॉम्ब सापडला. तो निकामी करण्यासाठी महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. यावेळी स्थानिक पोलीस व लष्कराने बॉम्बनाशक पथकाला बोलावले. या पथकाने सुरक्षितपणे आयईडी बॉम्ब नष्ट केला.
दरम्यान काल, बारामुल्ला जिल्ह्यात लश्कर-ए- तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे दहशतवादी भरतीचे मॉड्यूल उघडकीस आले. रविवारी संध्याकाळी क्रिरी भागात एका खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी कारवाई केली. लष्कर आणि पोलिसांच्या ५२ आरआरच्या संयुक्त पथकाने चहाच्या टपरीवर फिरते तपासणी केंद्र बनवले. त्यानंतर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तीन जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक चिनी ग्रेनेड, तीन ग्रेनेड आणि एके-४७च्या ३० राउंड जप्त करण्यात आले. लतीफ अहमद दार, शौकत अहमद लोन आणि इशरत रसूल अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनीही लश्कर-ए- तोएबाचे छुपे सदस्य असल्याची कबुली दिली.