उज्जैन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील प्रसिध्द महाकाल मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्याने वाद निर्माण झाला आहे.मंदिराच्या परंपरेनुसार महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भाविकांना प्रवेश करण्यास मनाई आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी हा नियम धाब्यावर बसविण्यात आल्याने व्यवस्थापनावरील काही पदाधिकारी आणि सर्वसामान्य भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी संध्याकाळी आपल्या पत्नी आणि दोन अन्य सहकाऱ्यांसह महाकाल मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून पूजा केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर वशिलेबाजी करण्याचा आरोप केला.सर्वसामान्य भाविक दर्शनासाठी तासन तास रांगेत ताटकळत असताना व्हिआयपींना खास सवलत का दिली जाते,असा प्रश्न काँग्रेसचे आमदार महेश परमार यांनी उपस्थित केला. भाविकांनीदेखील व्यवस्थापनाला याबद्दल जाब विचारला. त्यानंतर आता व्यवस्थापनाने याबाबत चौकशी सुरू केली आहे.
गेल्या चार महिन्यांच्या काळात अतिमहत्वाच्या व्यक्तींनी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याची ही चौथी घटना आहे.