शहापूर – शहापूरच्या शेरपोली घाटात स्पिड ब्रेकरमुळे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.तिन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्याने अपघातग्रस्त कारमधील दोघांचा मृत्यू झाला. तीनजण जखमी झाले. शहापूर तालुक्यातील शेनवे येथील ५ जण घोटी येथील हॉस्पिटलमधून कारने रात्रीच्या वेळी शहापूर येथे येत असताना हा अपघात झाला.
शेरपोली घाटात स्पीड ब्रेकरवर एका पीकअप गाडीने ब्रेक लावला. त्यावेळी तिच्या पाठीमागे असलेली कार पीकअप गाडीवर जोरदार जाऊन आदळली. त्यानंतर कारच्या मागून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये कारचा चक्काचूर झाला.कारमध्ये दोन महिला आणि तीन पुरुष होते ते गाडीतच चिरडले गेले. अपघातानंतर पाचही जण गाडीमध्ये अडकून पडले होते.दोन पुरुष व एका महिलेला स्थानिकांनी बाहेर काढले,मात्र वाहन चालक आणि एका महिलेला गाडीतून काढताना खुप शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यामध्ये महिला आणि कार चालकाचा जागीच मृत्यू झाला.या अपघाताची नोंद शहापूर पोलिसांत झाली असून अधिक तपास सुरू आहे.