लुधियाना – संयुक्त किसान मोर्चाची इतर दोन शेतकरी संघटनांमधील चर्चा अनिर्णित राहिली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी एकत्रितपणे आंदोलन करण्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. काही विषयांवर अद्याप एकमत झाले नसून त्यासाठी सर्व शेतकरी नेते १८ जानेवारी रोजी पुन्हा चर्चा करण्यात येणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे.
या बैठकीत संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने ६ नेत्यांनी भाग घेतला. तर किसान मजदूर मोर्चाच्या ७ नेत्यांनी भाग घेतला. किसान मजदूर मोर्चाचे संयोजक सर्वनसिंग पंधेर यांनी म्हटले आहे की, अनेक विषय सकारात्मक वातावरणात चर्चिले गेले. यातील काही वरिष्ट नेत्यांनी आपापल्या संघटनांच्या सदस्यांशी बोलून निर्णय देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांची चर्चा झाल्यानंतर ही बैठक पुन्हा होणार आहे. शेतकरी संघटना गेल्या वर्षीच्या १३ फेब्रुवारीपासून खनौरी व शांभू सीमेवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. जगतजीत सिंग डल्लेवाल हे खनौरी सीमेवर गेल्या ४९ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत.
या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शेतकरी संघटनेचे नेते ऊग्राहन म्हणाले की, आमच्यामध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी एका गोष्टीवर एकमत आहे. ते म्हणजे आमचे शत्रू व प्रश्न सारखेच आहेत. त्यामुळे आम्हाला एकत्र येऊनच लढा द्यावा लागेल. येत्या प्रजासत्ताक दिनी देशातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असून त्यामुळे आमचा संयुक्त लढा आधीच सुरु झाला आहे. येत्या काही काळात हा लढा अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान डल्लेवाल यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी ऊद्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.