शेगावच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

बुलढाणा – विठुमाऊली आणि गजानन महाराजांचा जयघोष अशा राजवैभवी थाटात शेगावच्या पालखीने आज आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केले. 54 व्या वर्षांत पदार्पण करणारी शेगावची पालखी तब्बल एक महिन्याच्या पायदळ प्रवासानंतर 27 जूनला पंढरपूरला पोहोचणार आहे.
आज ज्येष्ठ शुद्ध सप्तमीनिमित्त शेगावच्या पालखीचा पारंपरिक पद्धतीने प्रस्थान सोहळा पार पडला. संत गजानन महाराज मंदिरात विधिवत पूजन करून ‘श्री`च्या रजत मुखवटा सुशोभित पालखीत विराजमान करण्यात आला. टाळ मृदुंग, तुतारी, ढोल नगारे, बँडच्या निनादात आणि जयघोषात आणि भगव्या पताकाधारी वारकाऱ्यांसह पालखी निर्धारित मार्गाने रवाना झाली. पालखी 27 जूनला श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये डेरेदाखल होणार आहे. तेथील गजानन महाराज संस्थान शाखेत 2 जुलैपर्यंत पालखी मुक्कामी राहणार आहे.3 जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघणारी पालखी 23 जुलैला बुलढाण्याच्या खामगाव मुक्कामी राहील.24 जुलैला ती स्वगृही शेगावात परतणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top