मुंबई – परकीय संस्थात्मक गुंतवणुकदारांनी लावलेल्या विक्रीच्या सपाट्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात गेले काही दिवस सातत्याने घसरण होत आहे.आज दिवसाच्या सुरुवातीला आलेल्या काहीशा तेजीनंतर सलग सातव्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज सकाळी कालच्या बंद भावापेक्षा ३०.०२ अंकांनी वाढून ०.०४ टक्क्यांच्या वाढीसह ७६,२०१.१० अंकांवर उघडला होता. सुरुवातीच्या व्यवहारांत तो सुमारे ६०० अंकांच्या उसळीसह ७६,७६४ अंकांवर पोहोचला होता. मात्र दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स ३२.११ अंकांच्या म्हणजेच ०.०४ टक्क्यांच्या किंचित घसरणीसह ७६,१३८.९७ अंकांवर बंद झाला.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीसुध्दा सकाळी १०.५० अंकांच्या (०.०५ टक्के) वाढीसह २३,०५५.७५ अंकांवर उघडला होता. दिवसभरात तो २३,२३५ अंकांवर पोहोचला होता. दिवसाअखेर तो १३.८५ अंकांच्या (०.०६ टक्के) किरकोळ घसरणीसह २३,०३१.४० अंकांवर बंद झाला.