सांगली- पवित्र अशी गंगामाई आपल्या मोठ्या बहिणीच्या म्हणजेच कृष्णामाईच्या भेटीला येण्याचा वार्षिक सोहळा म्हणजे कृष्णामाई महोत्सव ! कृष्णाकाठी, वाई नंतर सांगलीच्या सरकारी घाटावर असणारे पटवर्धन सरकार यांनी स्थापन केलेल्या एकमेव कृष्णामाई मंदिरात सांगली महापालिकेच्या पुढाकाराने, सांगली संस्थान आणि सांगलीतील अनेक विविध संस्थांनी शुक्रवार ७ ते १२ फेब्रुवारी दरम्यान हा कृष्णामाई महोत्सव आयोजित केला आहे.
यावेळी सांगलीकरांची जीवनदायिनी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कृष्णामाईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्याप्रमाणे गंगेच्या काठावरती महाआरती केली जाते, तशीच कृष्णामाईची महाआरती केली जाणार आहे. तरी या पारंपरिक कृष्णामाई महोत्सवाला जास्तीत जास्त संख्येने सांगली शहर आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.