शिवाजी पार्क धुळमुक्त होणार जेसीबीने मातीचा थर काढणार

*मैदानावर पाण्याचा फवाराही मारणार

मुंबई – दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान ऐतिहासिक मैदान आहे. येथे क्रिकेटसह विविध खेळ खेळले जातात.त्यामुळे हे मैदान खेळांचे मैदान म्हणून वापरले जाते.आता हेच मैदान धुळमुक्त होणार आहे या मैदानावर साचलेला रेतीमिश्रित मातीचा ९ इंचाचा थर जेसीबीच्या मदतीने काढला जाणार आहे.याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या जी उत्तर दादर विभागाने पालिका प्रशासनाला सादर केला आहे.तसेच धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी क्रिकेट पिचेसची देखभाल करणाऱ्यांना मैदानासह आजूबाजूला पाण्याचा मारा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दादरच्या या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर अनेक राजकीय नेत्यांच्या सभा,भव्य सांस्कृतिक कार्यक्रम,क्रिकेटचे सामने होत असतात.सचिन तेंडुलकर,विनोद कांबळी सारखे प्रसिद्ध क्रिकेटपटू शिवाजी पार्क याच मैदानातून घडले आहेत. शिवाजी पार्क मैदानात दररोज शेकडो नागरिक याठिकाणी सकाळ- संध्याकाळी आणि संपूर्ण दिवसभर फेरफटका मारताना दिसतात.मात्र याच
२८ एकराच्या शिवाजी पार्क मैदानावर हवेसोबत येणार्‍या धूळ आणि रेती मिश्रित मातीचे तब्बल ९ इंच थर साचले आहेत. या मैदानात ७० टक्के मातीचा भाग आणि ३० टक्के हिरवळीचा भाग आहे. या मैदानातील धुळीमुळे प्रदूषण वाढत चालले आहे. त्यामुळे आता हे मैदान धूळमुक्त करण्याची योजना पालिकेने हाती घेतली आहे.

दरम्यान,आता छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील धुळीची समस्या कमी करण्यासाठी ‘आयआयटी’ मुंबईच्या तंत्रज्ञानाचा वापरही केला जाणार आहे. यासाठी नेमलेल्या सल्लागार समितीच्या निर्देशानुसार ‘आयआयटी ‘ने अहवालही सादर केला आहे. यामध्ये ‘आयआयटी च्या तज्ज्ञांनी अनेक सूचना केल्या असून उपायही सुचवले आहेत. यानुसार लवकरच कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अहवालाचा अभ्यास करण्यात येत असून प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top