शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांची हकालपट्टी

नवी दिल्ली:- शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन खासदार संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी खासादर गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली. किर्तीकर यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना सोपवण्यात आले. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. संजय राऊतांविरोधातील ही कारवाई म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना संसदीय पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी यासंदर्भातील एक पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवले होते. १७ फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळेल, असा निर्णय दिला. त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत गजानन कीर्तिकर यांच्या नियुक्तीचा निर्णय झाला होता.

शिवसेनेतील बंडाळीनंतर शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यानंतर लोकसभेतील १८ पैकी १३ खासदारही शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर शिंदेंनी शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली होती. आता संजय राऊत यांच्या जागी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांची संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटासोबत 5 खासदार आहेत. राज्यसभेत एकूण तीन खासदार आहेत. तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत.

Scroll to Top