सातारा – राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयी घडलेली घटना दुर्दैवी आहे. दोषींना कठोर शासन झाले पाहिजे. या घटनेचा कोणीही स्वतःच्या लाभासाठी राजकारण करून भांडवल करू नये, असे आवाहन भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी माफी मागितली होती. त्यानंतर आज उदयनराजे यांनी आवाहन केले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. त्यात ते म्हणाले की, राजकोट मधील पुतळा दुर्घटना निश्चितच दुर्देवी आहे. देशातील सर्व जाती धर्मातील नागरीकांमध्ये या घटनेचे दुःख आहे. पुतळा उभारणीतील कच्चे दुवे आणि निसर्गाची अवकृपा याच कारणामुळे शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या अभागी घटनेचे कोणी स्वतःच्या लाभासाठी राजकारण करून भांडवल करू नये, विशेष कोणाला लक्ष बनविणे टाळावे.
उदयनराजे पुढे म्हणाले की, समाजाने संयम बाळगावा. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन करावे. समुद्रतट, निसर्ग नियम आणि वातवरणीय बदलांचा पुरेपुर अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांना प्रेरणा देणारा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभारला जावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अल्प आयुष्यातील, अतुलनीय आणि अजोड कार्य आपल्या सर्वांच्या जीवनातील प्रत्येक वळणावर एका दिपस्तंभासारखे आहे. सामाजिक स्तरातील सर्वांना सातत्याने प्रेरणा देणा-या अश्या थोर महापराक्रमी राजाविषयी सर्वांनाच नितांत आदर आहे.