रायगड- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा 350 वे वर्ष आहे. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा उद्या शुक्रवारी किल्ले रायगडावर दिमाखात साजरा होणार आहे. यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मुख्य उद्घाटन कार्यक्रम सकाळी 8.30 वाजता होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. कार्यक्रमादरम्यान उन्हात लाखो शिवप्रेमींची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. रायगडावरील कार्यक्रमासह राज्यात विविध ठिकाणी उद्या राज्याभिषेकानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
6 जून 1676 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. यंदा या ऐतिहासिक घटनेला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. तिथीनुसार उद्या या मुख्य सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रायगडावर होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
आज गुरुवारपासूनच विविध कार्यक्रम येथे होत आहेत. या कार्यक्रमांसाठी रायगड प्रशासनातर्फे विविध 33 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शिवराज्याभिषेकाच्या आधी रायगडावर आज शिरकाई मंदिरात पूजा करण्यात आली. शिवभक्तांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर जगदिश्वराच्या मंदिरात आणि वाडेश्वर मंदिरात विधिवत अभिषेक करण्यात आला.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर 10 हजार लीटर आणि गडाच्या पायथ्याशी 40 हजार लीटर पाणीसाठा करण्यात आला आहे. शुक्रवारच्या मुख्य उद्घाटन सोहळ्याच्या वेळी नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने राज सदर, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, नियंत्रण कक्ष, निवारा कक्ष, आराम कक्ष या ठिकाणी त्याचबरोबर एसटी वाहन चालक, पोलीस, वैद्यकीय पथकांसाठीही मंडप उभारण्यात येत आहेत. शिवभक्तांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट सुविधा असणाऱ्या 4 तर बेसिक लाईफ सपोर्ट सुविधा असणाऱ्या 16 ॲम्ब्युलन्स सज्ज ठेवल्या आहेत.
पार्किंग, गड पायथा, पायरीमार्गावर प्रत्येकी 300 मीटर अंतरावर आणि गडावर आरोग्य अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक, पुरेसा औषधसाठा यासह एकूण 24 वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून 104 डॉक्टर्स व 350 आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र सज्ज ठेवण्यात आले आहेत.
गडाच्या पायथ्याशी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्किंग करून ठेवता येणार आहेत. गडाच्या पायथ्याशी अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सोयीसाठी पाचाड शिवसृष्टी परिसरात 3 हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.
गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध असणार आहेत. रोप-वे मार्ग हा निमंत्रितांसाठी मर्यादित राहणार आहे. रायगड किल्ले परिसरात जवळपास 2 हजार पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय पायरी मार्गाने रात्री गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पायरी मार्गावर पुरेसे पथदिवे लावण्यात आले आहेत.
सोहळ्याला होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीम, वॉकी टॉकी, हॅम रेडिओ, पोर्टेबल साऊंड, सर्च लाइट, वीज अटकाव यंत्रणा आदी साधन-साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. यासह सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण सोहळ्यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी प्रशासनाशी तत्काळ संपर्क साधण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, 7 जूनपर्यंत गेटवे ऑफ इंडिया येथेही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 1 जून रोजी जाणता राजा हे महानाट्य सादर करण्यात आले. 2 जून रोजी राजस्थानी लोककला, 3 व 4 जून रोजी महाराष्ट्राची लोककला, 5 ते 7 जून दरम्यान गोवा व गुजरात या राज्यातील लोककलांचे सादरीकरण होणार आहे. यासोबतच 1 ते 7 जून या कालावधीत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
शिवराज्याभिषेकासाठी किल्ले रायगड सजला! जय्यत तयारी! मोदींच्या संदेशाचे प्रक्षेपण
